Wednesday, January 3, 2024

जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे?

जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे स्वतःचा प्रामाणिक पणा व आत्मविश्वास कधीच बदलू द्यायचा नाही आणि किती ही अडचणी आल्या तरी डागमगायचे नाही व खऱ्याची साथ कधीच सोडाडायची नाह या तत्व निष्ठ वागण्याने आपल्या स्वतःला प्रत्येक समस्येवर मार्ग सापडत जातात व कठीण काळात कणखर भूमिका घेता येतात अगदी सहज पणे व्यक्ती यशाकडे वाटचाल करते, जीवन जगण्याचा मार्ग प्रत्येकाला मिळतं असतो फक्त त्याला सर्वोत्तम करण्याचा निर्णय स्वतःच्या भक्कम आत्मविश्वास व बुद्धी मत्ते वर घ्यावा आणि वेळ प्रसंगी अनुभवी जाणकार व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा,

Thursday, September 28, 2023

जनार्दन स्वामींच्या ओव्या

जनार्दन स्वामींच्या ओव्या

१. अनंत निर्गुण सर्वां ठायीं पूर्ण । न करी निर्वाण दासालागीं ॥
हांकेबरोबरी धांवोनी सत्वरी । भक्तालांगीं तारी गुरुनाथ ॥
सुंदर तें ध्यान वसे औदुंबरीं । व्याघ्रचर्मधारी शोभतसे ॥
काषाय अंबर दंडकमंडलु । डमरु त्रिशुलु शंखचक्र ॥
किरीट कुंडलें रुद्राक्षाच्या माळा । वैजयंती गळां हार रुळे ॥
सूर्य चंद्र नेत्र शेषफणी छत्र । पीतांबर वस्त्रपरिधान ॥
गुरुचरणीं सर्व तीर्थाची मिरासी । म्हणोनी जगासी उद्धरिती ॥
जनार्दन म्हणे न लगे ब्रम्हाज्ञान । गुरुचरणीं मन राहो सदा ॥

२. आतां गुरुराया परिसा विज्ञापना । दासाची करुणा येऊं द्यावी ॥
नेणोनियां सोय फिरलों दिशा दाही । झाले दु:ख देहीं बहुसाल ॥
तुमची ब्रीदावळी पतितपावन । कीर्ति हे ऐकोन शरण आलों ॥
माझा मायबाप गणगोत बंधु । तूंचि कृपासिंधु गुरुराया ॥
आतां कांहीं नेणें तुमच्या पायांविणें । संसाराचें पेणें दूर केलें ।
जोडोनियां हात शिर पायांवरी । ठेविलें निधारी जनार्दनें ॥

३. कंठी राहो नाम हा माझा नवस । पुरवावी आस गुरुराया ॥
वसोनी अंतरीं बोलवीं उत्तर । जेणें हा संसार सार होय ॥
सर्व चराचरीं द्दष्टि ऐसी करीं । दावीं रूप हरी अखंडित ॥
ऐसिया वासने स्वामी साहय होणें । काल वांयां जाणें ऐसे न हो ॥
तुजऐसा नाहीं त्रिभुवनीं उदार । कृपें देईं वर जनार्दन ॥

४. अहो सद्रुरु अनंता । फार काय बोलूं आतां ॥
नारायणा कृपावंता । असों द्यावी माझी चिंता ॥
भलते याती हो कां जन्म । परी आवडो गुरुनाम ॥
नामें पतित तारिले । पशुपक्षी मोक्षा नेले ॥
मातंगाचे मुखीं वेद । लीलें करविला संवाद ॥
जरी करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥
जनार्दन चिंती भावें । याचें स्मरण असों द्यावें ॥
मुळीं नाहीं गुण म्हणोनि निर्गुण । ब्रम्हा परिपूर्ण गुरुनाथ ॥
ज्याचे गुण गातां वेद मौनावला । शेष ओढवला झाला शय्या ॥
ब्रम्हादिक ज्याचे झाले आज्ञाधर । मानव पामर कोण पुढें ।
तोचि कृष्णातीरीं वसे औदुंबरीं । दासां कृपा करीं तारावया ॥
राव रंक याती वर्व न विचारी । भाविकां अंतरीं राहे सदां ॥
स्मरतां येतो ऐसें वेद बोभाईला । तया तो ब्रीदाला रक्षीतसे ॥
जया चित्तीं ठेवा कल्याण असावें । गुरुसी रिधावें शरण वेगें ॥
ऐसी वेदवाणी ऐकोनिया कानीं । जनार्दना मनीं निश्चय झाला ॥
ॐकार ज्याचा वाचक | जगध्देतू धीप्रेरक | तोचि देव सच्चित्सुख | एक दत्त || १ ||*.
*दत्त अज निराकार | स्वेच्छामात्रें हो साकार | अव्ययात्मा भक्ताधार | भक्तिगम्य || २ ||*.
अर्थ:.
आत्मानंदा कडे घेऊन जाणारा ॐकार ज्याच्या बद्दल बोलतो,
जो जगाच्या उत्पत्ती-स्थिति-लय या चक्रातून
सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे.
तोच एकमात्र देव,
भक्तांचा सत्च्चिदानंद सुखाशी एकी घडविणारा दत्त आहे. || १ ||
हा जन्म रहित निराकार आहे.
भक्तांच्या इच्छामात्रे साकार होतो.
हा अखंड निराकार आत्मस्वरुप आहे.
भक्तांचा आधार आहे.
आणि भक्तिने जाणला जातो. || २ ||

Friday, February 2, 2018

एक होते कुसुमाग्रज (८): विशाखाचे दिवस (पु.ल.देशपांडे)

एक होते कुसुमाग्रज (८): विशाखाचे दिवस (पु.ल.देशपांडे)
माझे तारुण्य जन्माला आले ते कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याच्या आकाशात सोडलेल्या 'विशाखा' नक्षत्रावर. कवितेने सुरांशी घटस्फोट घेतला नव्हता; त्या जमान्यात माझी कवितेशी मैत्री झाली. गळयात गळा घालणारी दाट मैत्री. त्या काळात रविकिरण मंडळातले गिरीश, यशवंत, विठ्ठलराव घाटे शेकडो श्रोते तन्मयतेने ऐकत असत. श्रोत्यांची संख्या शेकडोंच्या हिशोबात असल्यामुळे कवितेच्या चिकित्सेला जागा नव्हती. यशवंतरावांची 'आई' ऐकून माणसे डोळे टिपीत. गिरीशांनी 'आणि पुशिली लोचने डॉक्टराने' म्हटली की, ऐकणारेही डोळे पुशीत. संजीवनीबाईंचा सूर कानी पडला की,मने तृप्त होत. गोकुळीच्या कान्ह्यानेही वेड लावले होते. ते सारे गोड होते. जरा गोड नव्हे, गोडच गोड आहे की काय अशी शंकाही ओठावर नव्याने फुलणार्‍या मिशीसारखी उगवायला लागली होती. तेवढ्यात अत्रे यांची 'झेंडूची फुले' आली आणि गोड कुठले आणि गुळचट कुठले ते कळायला लागले. चांदरातीची माया पसरुन काणेकरच त्या चांदरातीच्या वातावरणातून बाहेर पडून 'आकाशातील पोलिस' ला जाब विचारु लागले होते. ना.घ. आणि आ.रा. देशपांड्यांची गाणी तबकड्यांवर आली होती. पण कवी आणि श्रोता यांच्यामध्ये ती गीते गाणारे गायक आणि गायिका येत होते.
कोलाहलातून माझे तारू माझा स्वतःचा सूर शोधीत होते किंवा सुसंवादी सुरांची सोबत शोधीत होते. ही सोबत घेऊन कुसुमाग्रज आले. माझ्या तारुण्यातला कवी मला सापडला. सांगाती भेटला. तिथून पुढील वर्षे, पुढले सारे दिवस हे विशाखाचे दिवस. या काळात प्रेम केले ते विशाखातल्या ओळींनी प्रेमपत्रे सजवीत. मनातल्या त्वेषाला 'कशास आई भिजवीसी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल' सारख्या ओळींनी वाट फोडली. भोवतालच्या घडामोडींचे संस्कार ज्यांच्या ज्यांच्या मनावर या काळात जाणतेपणाने उमटत होते त्यांचे त्या यौवनकाळातले उद्गाते कुसुमाग्रज होते. कुसुमाग्रज आमचे हीरो नव्हते. ते आमच्यातलेच एक होते. माझ्या अंत:करणातल्या स्वरकोषात जसे बालगंधर्व गातच असतात तसे कुसुमाग्रज कविता म्हणतच नांदत होते. आमच्या जाणिवांना वाचा फुटायची ती त्यांच्या काव्यपंक्तीतूनच.
हा कवी आम्हाला कुठल्याही काव्यगायनाच्या समारंभात व्यासपीठावरुन भेटला नाही. हा कवी कुठल्याही उत्सवात काव्यगायन करीत नव्हता. किंबहुना आजही कुसुमाग्रज आपल्या आयत्या वेळेच्या अनुपस्थितीविषयीच अधिक प्रसिद्ध आहेत. कुसुमाग्रजांनी जणू काय अदृश्य राहण्याचे निराळेच कोकिळाव्रत घेतले होते.
गडकरी, बालकवी आणि केशवसुत या तिन्ही कविश्रेष्ठांच्या संस्कारांचे सौष्ठव घेतलेली परंतु ३५ ते ४२ या कालखंडातले तरुणांच्या मनावरचे नवे संस्कार शोधून फुललेली ही कविता होती. तिची जवळीक तत्कालीन तरुण मनांना अधिक वाटली. कारण ती वाचताना मला कविप्रतिभा असती तर मी हेच आणि असेच सांगितले असते, असे त्यांना वाटत होते. मग सांगण्याची ती उर्मी पारतंत्र्याविषयक वाटणार्‍या संतापाविषयी असो की प्रेयसीविषयी वाटणार्‍या ओढीची असो.
त्या काळात कुसुमाग्रजांची 'स्वप्नाची समाप्ती' ही कविता आली. गोदातीराच्या दिशेने सावरकर, गोविदांनंतर पुन्हा एकदा तेजाची गंगा वाहू लागली.
"प्रकाशाच्या पावलांची चाहूल ये कानावर
ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर"
असे सांगत एक कवी आला. आपल्या प्रेयसीला
‘काढ सखे, गळ्यातील | तुझे चांदण्यांचे हात
'क्षितिजाच्या पलीकडे | उभे दिवसाचे दूत’
म्हणणारा, रात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल पाहणारा, त्या काळाचा वैतालिक होऊन उभा राहिला.
हा कवी प्रेमासाठी झुरणारा नव्हता. उसासे टाकणारा नव्हता. त्या प्रेमात प्रेयसीच्या मिठीत क्षण क्षण फुलणारी स्वप्ने होती आणि या स्वप्नांची समाप्ती कधी होते, नव्हे ती होणे अटळ कसे आहे याची जाण होती. 'बी' कवींनी एका ठिकाणी नव्या मराठी कवितेच्या नव्या उमेदीच्या नित्य जिव्हाळ्याच्या अनेक खुणा आहेत, असे म्हटले आहे. कुसुमाग्रजांनी आमच्या पिढीचे हे नवे जिव्हाळे आणि नव्या उमेदी ओळ्खल्या. कुठल्याही तबकडीचा किंवा काव्यगायनाचा आधार नसतानाही नव्या रसिक तरुण पिढीत कुसुमाग्रजांची कविता. त्या कवितेला ओज होते, परंतु खरखरीतपणा नव्हता. नव्या युगाच्या नव्या जाणिवांनी सधन झालेली ही कविता पण तिने कुठेही आपले कवितापण सोडले नव्हते.
कुसुमाग्रजांच्या कवितेने स्वप्नांची समाप्ती दाखवली, पण जीवनातल्या स्वप्नांची किंमत उतरवली जात नाही. त्यांनी उत्साहाच्या भरात शृंगाराचीच अवहेलना केली नाही. त्यांनी अवहेलना केली ती दुर्बलांच्या शृंगाराची. कारण तो शृंगारच नसतो. म्हणून ती एक निसर्गाने दिलेल्या अलौकिक वरदानाची दुबळ्या इंद्रियात होणारी शापावस्था असते. तिथे शृंगारदेखील निस्संग होऊन साधलेला नसतो. जीवनात रणभूमीसारखी रतिशय्येवरसुद्धा झपूर्झाची अवस्था ही समर्थ देह आणि समर्थ मनाला साधलेली सिद्धी असते. त्या अवस्थेला कुसुमाग्रज 'वेड' हा साधा शब्द वापरतात.
'होते म्हणू स्वप्न एक, एक रात्री पाहिलेले
होते म्हणू वेड एक, एक रात्र राहिलेले'
असे एका रात्रीचे का होईना, पण वेड लागण्याचे भाग्य त्यांनी मोलाचे मानले. खर्‍या अर्थाने पृथ्वीमोलाचे मानले. पृथ्वीच्या प्रेमगीतातील पृथ्वी ही त्या युगाची नायिका होती. त्यागाचे अनेक स्थंडिल पेटले होते. त्यात जीवितांची आहुती देण्यासाठी अनेक भास्करांना आपल्या प्रेयसीचे आपल्या गळ्यात पडलेले चांदण्याचे हात दूर करावे लागले होते. अशा भास्करावर प्रेम करणार्‍या प्रेमिकांनीही त्या पृथ्वीसारखेच प्रेम केले होते. हे अलिंगन आपल्याला भस्मसात करील याची खात्री असूनही केले होते. निरनिराळ्या राजकीय पक्षांत दीपज्योतीवर झेपावणार्‍या पतंगासारखे आयुष्य झोकून दिलेले तरुण आजूबाजूला दिसत होते. कपाळी मुंडावळ्या बांधलेल्या अवस्थेत ब्रिटिशांच्या फौजदारांनी वरांना चतुर्भुज करुन न्यावे आणि त्यांच्या वधूंनी डोळे कोरडे ठेवून ते पाहावे अशा घटना घडत होत्या. नव्या संसाराची सुरुवात डाळमुरमुर्‍याच्या भत्त्यावर करणारी आणि देशासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवताना प्रेमाचे मोल कमी न मानणारी जोडपी होती. अशा एखाद्या प्रेयसीला आपल्या भावी गृहस्थापनेच्या अस्थिरतेविषयी कोणी प्रियकर 'सावधान' असा इशारा देऊ लागला तर तिच्या ओठी 'नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे' ह्याशिवाय दुसरी ओळ आली असेल? छ्त्तीस ते बेचाळीस या सहा वर्षांच्या काळातले तरुण आणि तरुणी कुसुमाग्रजांच्या कवितेत बोलू लागले. त्यांना प्रिय आणि आदर्श वाटणार्‍या अनुभवांची सारी चित्रे त्यांच्यापुढे कुसुमाग्रजांनी रंगविली. त्या चित्रात त्या काळातल्या तरुणांच्या आशाआकांक्षांचे कालसापेक्ष दर्शन होतेच पण त्याबरोबर काळावर मात करुन जाणारी चिरंतन सौंदर्याने नटवलेली अनेक चित्रे होती.
'विशाखे'त अशी असंख्य मोहक चित्रे आहेत तर काही रुधिरात रंगलेली. अमरशेख आपल्या पल्लेदार आवाजात 'सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते' म्हणताना त्या मैदानामागल्या क्षितिजाचा पट होऊन ते दृश्य हजारो डोळ्यांपुढे उभे राहायचे. काही काही ओळींनी तर माझ्या मनःपटलावर त्यावेळी त्याकाळी उभी केलेली चित्रे आज त्याच ताज्या ओलेपणाने टिकून आहेत. प्रवासात कुठल्यातरी डाक बंगल्यात रात्रीचा आसरा घेतलेला असतो. पहाटे जाग येते. अंगणातल्या वृक्षांतून पाखरे भर्रकन चारापाण्याला उडून जातात. आणि एकदम 'सोन्याच्या दर्यात गल्बते जणु गोजिरवाणी | झाला उषःकाल राणी' या ओळी उमटतात.
कुसुमाग्रजांच्या प्रतिभेला त्या काळातल्या समीक्षकांनी धगधगत्या यज्ञातून प्रकटणार्‍या असुरसंहारिणी दुर्गेच्या स्वरुपातच पाहिले. वास्तविक, ती उमेसारखी विविध रूपधारिणी आहे. तिला क्रांतिकारकांनी केलेल्या सर्वस्वाच्या होमाइतकीच 'माजघरातल्या मंद दिव्याच्या वातीची ओढ' आहे. जीवित हे समुद्रासारखे आहे ते केवळ सुंदर नाही आणि भीषण नाही, ते तिला ठाऊक आहे. जीवनाचा कुंभ हाती देणार्‍या कुंभाराची चौकशी करण्यात आयुष्य दवडण्यापेक्षा 'आमंत्री बाहू पसरुन इकडे ही यक्षकन्या ही गुणी' म्हणणारे कुसुमाग्रज जीवनाला एकाच सुराने आळवीत बसले नाहीत. इथेच त्यांच्या प्रतिभेला लाभलेले चिरतारुण्य आहे. मराठी कवितेत कितीतरी नवे संप्रदाय आले. खूप भूकंप झाले. स्त्रीचे स्त्रीत्व कशात आहे हा जसा आता नव्या जगात वादाचा मुद्दा झाला आहे तसाच कवितेतले काव्य कशात आहे हाही झाला आहे. हे होणे अपरिहार्य आहे. दुसर्‍या महायुद्धाने एक-दोन देशांना किंवा खंडांनाच नव्हे तर सार्‍या मानवी जीवनाला मुळातूनच हादरे दिले आहेत. धर्म, नीती, कुटुंब, शील यात या सार्‍या मूल्यांची कठोर तपासणी सुरु झाली आहे. अणुबॉम्बपेक्षाही हा धक्का मोठा आहे. साहजिकच हा धक्का सतत नवनिर्मितीच्या चिंतनात असणार्‍या कवीला आधी आणि अधिक जाणवतो. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात कुसुमाग्रज म्हणत होते 'रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल.' स्वातंत्र्याबरोबर तो उषःकाल येईल असा हा आशावाद होता. स्वातंत्र्य येऊन पाव शतक लोटल्यावर त्या रात्रीचा असा गर्भपात का झाला? पण कुसुमाग्रजांनी रात्रीच्या गर्भात उद्याचा उषःकाल पाहिला. त्या काळीही एकदा तो उषःकाल झाला की सारे काही छान होईल असला भाबडा आशावाद बाळगून तेही बसले नव्हते. निर्मिती, विध्वंस, त्यातून पुन्हा निर्मिती आणि पुन्हा विध्वंस ह्या निसर्गचक्राची त्यांची जाणीव पक्की होती. कारण त्याच काळात त्यांनी लिहून ठेवले आहे -
'ध्येय प्रेम आशा यांची
होतसे का कधी पूर्ती?
वेड्यापरी पूजतो या
आम्ही भंगणार्‍या मूर्ती'
मूर्ती भंगतात त्या घडवायच्याच नाहीत हा पळपुट्यांचा विचार झाला. मह्त्त्वाचे असते ते नव्या नव्या मूर्ती घडवण्याचे वेड लावून घेणे. अकस्मात घडलेल्या जननानंतर अटळ मरणाकडे जाणारी वाट ही चालताना सुंदर करीत जाणे, त्या वाटेवरचे सौंदर्य पाहून सोबत चालणार्‍याच्या नजरेला ते आणून देणे, जीवनाचे सारे शहाणपण ज्या वेडापोटी जन्माला येते ती वेडे लावून घेणे. त्यांच्या कवितेत 'वेड' हा शब्द अनेकदा येतो.
१. होते म्हणू वेड एक | एक रात्र राहिलेले
२. उजेडात दिसू वेडे | आणि ठरु अपराधी
३. हे काय अनामिक आर्त पिसे
४. सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
५. देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार...
६. वेड्याने खोदले प्रचंड मंदिर
७ नंतर सुरु हो वेड्याचे पूजन
८. आणि अंती मृत्यूच्या घासात वेडा सापडे
९. वेडात मराठे वीर दौडले सात..
नाहीतरी शेक्सपीअरने कवी, वेडे आणि प्रेमिक यांची गाठ मारली आहेच. कसले तरी वेड यौवनाचे लक्षण, ती वेडे आणि त्या वेडातील स्वप्ने ओसरली आणि सबुरीचा आणि औचित्याचा फोल विवेक सुरु झाला की यौवनाच्या चक्राची फेरी संपली हे ओळखावे. विशाखाचे दिवस हे कुसुमाग्रजांच्याही वेडाचेच दिवस होते. एकोणीसशे चौतीस ते एकोणचाळीस सालातल्या ह्या कविता कुसुमाग्रजांच्या ऐन पंचविशीतल्या.
वृद्धत्वातही त्यांच्या प्रतिभेचे ताजेपण ओसरलेले नाही. त्यांच्या भावनांना बुद्धीच्या भट्टीतून भाजून निघण्याची सवय आहे. त्यामुळे आजही त्यावर वार्धक्याचा गंज चढू शकत नाही. त्यांनी पुरोगामित्वाचा कुठलाही एकच एक बावटा नाचवला नाही की खांद्यावर आंधळ्या श्रद्धेची पताका वागवली नाही. आजही सतत नवी निर्मिती करणार्‍या कुसुमाग्रजांकडे पाहिले, त्यांच्या सहवासात रात्र जागवण्याचा योग आला म्हणजे वाटते की त्यांच्या विशाखाने उजळलेल्या इतरांचे तारुण्य मागे राहिले तरी कुसुमाग्रजांचे विशाखेचेच दिवस चालू आहेत. त्यांचे नव्या मूर्ती घडविणे थांबले नाही. 'वयपरत्वे' हा शब्द त्यांच्या बाबतीत लावता येत नाही. आधुनिक काव्याचे समीक्षक मर्ढेकरांच्यानंतर मराठीत कवितेने घेतलेल्या वळणाच्या अनुषंगाने काव्याची समीक्षा करीत असतात. पण साठीच्या आसपास असणार्‍या कुसुमाग्रज, बोरकर आणि रेग्यांच्या एकाहत्तर सालात लिहीलेल्या कवितांमधील ताजेपणा त्यांनाही बुचकळ्यात टाकत असावा. तिन्ही तीन तर्‍हेचे वृक्ष. साठ वर्षांपूर्वी आमच्या भाग्याने मराठीच्या प्रांगणात उगवलेले आणि आजही मातीतला रस शोषून फुलायची ताकद असलेले त्याच जोमाने बहरणारे. असले झाड जुने झाले म्हणून त्याच्यावर फुलणारे फूल जुने नसते. आजही कुसुमाग्रजांची कविता अचानक भेटते आणि आमच्यासारख्यांचा आंतरअग्नी क्षणभर फुलवून जाते. हा नाविक आजही 'निर्मित नव क्षितिजे पुढती' म्हणत चालला आहे. आणि म्हणूनच कुसुमाग्रजांना आजही भेटलो तरी वयाचा विसर पडतो. आम्ही विशाखाच्या दिवसात शिरतो.
आज मागे पाहताच कृतार्थ वाटावे अशीच कुसुमाग्रजांची साहित्य-साधना आहे. काव्य, कथा, निबंध, कादंबरी आणि नाटक या क्षेत्रांतही पुढे जाताना त्यांनी मागे सुंदर कुसुमेच ठेवली आहेत. त्यांनी तुडवलेली वाट सुगंधी केली आहे. रंग वैभवाने नटवली आहे.
महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांना कुसुमाग्रज आपले वाटत आहेत. माझ्यासारख्यांना ही आपुलकी अधिक, कारण आमच्या जीवनातल्या वसंतकाळातला हा कोकीळ, आमच्या जीवनातल्या छोट्यामोठ्या वेडाचे हे विशाखाचे दिवस. आजही मनाला त्या दिवसांची ओढ लागली की हात पुस्तकांच्या कपाटातून 'विशाखा' काढतात. जुनी ट्रंक उघडल्यावर त्यातल्या वस्त्रांना बिलगलेल्या वाळ्याचा सुगंध यायचा, तसा जीवनाच्या या जीर्ण होत चाललेल्या वस्त्रांच्या कुठल्या तरी आतआतल्या घडीतून विशाखाच्या दिवसांचा सुगंध दरवळायला लागतो.
- पु.ल.देशपांडे

Thursday, January 25, 2018

नियतीला ही मदत लागते - माझे वपु

काही माणसं जन्माला येतानाच ‘सुखी माणसाचा’ वॉश अँड वेअर सदरा घालून येतात. ‘वॉश अँड वेअर’ असं म्हणायचं, पण या थोर लोकांनाही गरज पडणार नाही असे यांचे योग. किंवा तशी गरज पडलीच तर लाँड्रीचे दुकान यांच्या इमारतीत तळमजल्यावर असतं. वरच्या मजल्यावरून नुसत्या टाळ्या वाजवल्या तरी या महाभागांना एकदम ‘तव्यावरची पोळी’ म्हणतात, त्याप्रमाणे गरम गरम कपडा घरपोच मिळतो. यांचा वाणी घरपोच सामानात, साध्या दळलेल्या मिठाच्या ऐवजी चुकूनही ‘खडे मीठ’ पाठवणार नाही. या सुखी माणसांना ‘मिठाला जागवणारा’ फक्त वाणीच भेटतो असं नाही, तर खुर्च्यांना वेत बसवून देणाराही, दिलेल्या तिथीवर काम करून देणारा भेटतो. पावसाळ्यात ह्यांची घरं नेमकी ‘पलंग ठेवला’ तिथं गळत नाहीत. घराला नवीन रंग दिल्यावर भिंतीला टेकून डोक्याच्या तेलाचे भिंतीवर नकाशे उठवणारे पाहुणे या सुखी माणसांच्या घरी येत नाहीत. डबेवाल्याकडून या मंडळींचा डबा कधी बदलून दुसऱ्या पत्त्यावर जात नाही. सुखी माणसांची मुलं नाकात चिंचोका अडकवून घेत नाहीत. इतकंच नव्हे तर त्यांना दातांचाही त्रास होत नाही. या माणसांची बुशशर्टची बटन्स जशी संपावर जात नाहीत त्याचप्रमाणे घाईत असताना चपलेचा अंगठाही ‘अचानक’ हाफ-डे कॅज्युअल घेत नाही. या पुण्यवंतांना चष्म्याचा नंबर पहिल्याच फटक्यात अचूक देणारा चष्मेवाला भेटतो. या असामी जर कधी सिनेमाला गेल्या तर उंच मानेचा माणूस यांच्याच खूर्चीसमोर येत नाही. इतकेच नव्हे तर मध्यंतरात यांनी जर शेंगदाणे घेतले तर त्यातला शेवटचा दाणा खवट निघत नाही. रेल्वेस्टेशन या मंडळींच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असतं तर बसस्टॉप कुजबुजण्याच्या अंतरावर असतो. या महाभागांच्या घराजवळ नुसतीच ‘इंडियन एअरलाइन्स’ची बस थांबते असं नाही तर पोस्टाची मोबाईल बस योजना ‘भारत सरकारनं’ या जमातीसाठी सुरू केली असावी अशी शंका येते. सुखी माणसांची सासुरवाडी यवतमाळसारक्या लांबच्या गावी असते. पण बायकोचा मामाच असिस्टंट स्टेशनमास्तर असतो, त्यामुळे तिकीट घरपोच.
अशा मोजक्याच भाग्यवंतांपैकी एक, किंबहुना एकमेव असा दिनेश वाईकर. हा राहतो त्या इमारतीसमोर फिरत्या पोस्टाची गाडी नुसतीच येऊन उभी राहत नाही तर त्या गाडीतला एक कर्मचारी वाईकरांच्या घरी येऊन पत्रं गोळा करून नेतो.
आयुष्यात इतर गोष्टी लाभल्या तरीही घरमालक लाभणं म्हणजे शनिचा खडा लाभण्यासारखं. वाईकर त्या बाबतीतही भाग्यवान ठरलाय. इतर भाडेकरूंपेक्षा त्याला जास्त सवलती मिळतात. वाईकरांचं एस. टी. मध्ये कुणीही नात्यातलं नाही, पण तिथंही त्याला रांगेत उभं राहण्याची पाळी येत नाही. किंबहुना रांगेचा शाप त्याला कुठेही भोगावा लागलेला नाही. एक डॉक्टर तसा अनेकांचा फॅमिली डॉक्टर असतो. पण त्या बाबतीतही चौकोनी चेहरा करून त्याला कधी वेटिंग हॉलमध्ये थांबायची पाळी आली नाही.
केव्हातरी खनपटीला बसून मी त्याला विचारलं, “तुझं गोत्र अत्री का?”
“मी कधी गोत्राचा विचारच केला नाही. मध्येच तुला गोत्र का आठवलं?”
“अत्री म्हणजे सगळ्यांशी मैत्री, असा एक वाक्प्रचार आहे.”
“मला कुठे खंडीभर मित्र आहेत!”
“खंडीभर नसतील. पण तू माणसं जिथं जिथं जोडलीस ती सगळी तुझ्यासाठी झटतात.”
“तसा मी भाग्यावान आहे, पण…”
“काय झालं? …”
“यातली काही भाग्य कष्टसाध्य आहेत.”
“म्हणजे कशी?”
“आता आमचे मालक इतरांपेक्षा माझ्यावर जास्त लोभ करतात.”
“तेच. कसं?”
“सांगतो. दर महिन्याला एक तारखेला मालकांचा भय्या सकाळी आठ वाजता दारात हजर होतो. दोन वर्षांपूर्वीची हकीकत. मालकांचे वडील आजारी आहेत असं मला समजलं. मी संध्याकाळी मालकांच्या घरी गेलो. वडिलांची चौकशी केली. काही मदत लागली तर कळवा म्हणालो ‘अधूनमधून गप्पा मारायला येत जा, त्यांना एकटं वाटतं.’ असं मालक म्हणाले. मी मग एक दिवसाआड रोज संध्याकाळी मालकाकडे महाभारत वाचून दाखवायला जाऊ लागलो. मला केव्हातरी समग्र भारत वाचायचं होतंच. ते मालकांच्या वडिलांना वाचून दाखवायच्या निमित्तानं झालं तरी. नाहीतर निष्कारण चालढकल करण्यात आपण खूप आयुष्य वाया घालवतो. महाभारतानंतर रामायणाचा विचार होता. पण त्यापूर्वी मालकाचे वडील गेले. तेव्हापासून मालकाचा भय्या दाराशी येईनासा झाला. आपण भाडं थोडंच चुकवणार आहोत. आपल्याला एक-दोन दिवसांची सवलत हवी असते. ती मिळाली. स्वार्थ-परमार्थ…”
“तुम्हाला इतका वेळ बरा मिळाला.”
“वपु, अशी कल्पना करा. सकाळी आरामात सात वाजता उठायचं. चहा, दाढी, आंघोळ आठ वाजेपर्यंत. नंतर पंधरा मिनिटं चक्क टिवल्याबावल्या. साडेनऊ वाजता साधारणपणे तुम्ही घर सोडत असाल तर सकाळी सव्वा तास वेळ उरतो. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत टिवल्याबावल्या. रात्री नऊला जेवण असेल तर दोन तास मिळतात. नऊ ते साडेनऊ जेवण. पुन्हा दहा वाजेपर्यंत अर्धा तास उरतो. दहा वाजता जनगणमन. रोज पावणेचार तास मिळतात. त्या वेळेचा आपण काय उपयोग करतो? कुणाला तीन तास रिकामे, कुणाला दोन, कुणाला अडीच. पण त्याचं आपण काय करतो? पावणेचार तासांप्रमाणे वर्षात सत्तावन्न दिवस होतात. एका वर्षात आपण दोन महिने वाया घालवतो. मग उभ्या आयुष्यात असं वेस्टेज किती होईल? कॉलेजचा कोर्स होईल, म्हणूनच ‘वेळ मिळत नाही’ म्हणणाऱ्या माणसांवर माझा विश्वास नाही.”
मी पटकन म्हणालो, “वाईकर, यू आर ग्रेट.”
“ग्रेट वगैरे असं काही नसतं हो, आणि तसं काही असलंच तर तो ग्रेटनेस मिळवणं अशक्य नसतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टी करून आयुष्य सोपं करता येतं.”
“तेच कसं?”
“माझ्या घरासमोर पोस्टाची गाडी थांबते. हा भाग नशिबाचा. एकदा धुमधडाक्यात पाऊस पडत होता. मी चहाचा कप घेऊन गॅलरीत उभा होतो. मला एकाएकी त्या व्हॅनमध्ये काम करणाऱ्या माणसांची कीव आली. ती गाडी सुटायच्या आत मी त्यांना किटलीभर घरचा चहा करून पाठवला. त्याची जाणीव ठेवून त्यांचा माणूस घरी येऊन माझी पत्रं न्यायला लागला.”
जरा वेळ थांबून वाईकर म्हणाला, “अगदी छोटी छोटी पथ्यं आपण पाळत नाही. आपलं किंवा आपल्या घरातल्यांचं आजारपण संपलं की डॉक्टरची आपण आठवणही ठेवत नाही. माझ्या फॅमिली डॉक्टरला माझं दर महिन्याला एक पत्र जातं. केवळ ख्यालीखुशाली कळवण्यासाठी. आजार बरा झाल्यानंतर आभाराचं पत्र जातं. याउलट आरसीव्हीपीलाही दाद न देणारे महाभाग इथं आहेत.”
“तुमचा शब्दनशब्द पटतोय.”
“एस. टी. तला पी.आर.ओ. असाच परिचयाचा झाला. मला वर्षातून कमीत कमी चार वेळा एस. टी.नं प्रवास करावा लागतो. ड्रायव्हरनं जर गाडी कौशल्यानं चालवली असेल तर माझं लगेच कौतुकाचं पत्र पी.आर.ओ. ला जातं. ड्रायव्हरच्या नावासहित. सुमारे दोन डझन पत्रं मिळाल्यावर त्यानं भेटायला बोलावलं. ओळख झाली, वाढली. आता नो प्रॉब्लेम.”
मी थक्क होऊन बघत होतो. वाईकर म्हणाला, “माणसाला जन्माला घालण्यामागे, त्याला छळावं अशीच काही नियतीची इच्छा नसते. ती प्रत्येकाला काही ना काही देते. बाकीचं आपण मिळवायचं. दिवसाचे अकरा तास हे हात जर राबले तरच एक तास नियतीकडे काही मागण्यासाठी पसरण्याचा त्यांना हक्क आहे. आपणही नियतीला मदत करायची असते. मग काही कमी पडत नाही. हे हात मदतीसाठी आहेत, सगळ्यांच्या. The best helping hand is at the end of your arms.”
अंक – निवडक कालनिर्णय – १९७३

Wednesday, January 24, 2018

पु ल च्याबद्दल विजय तेंडूलकर म्हणतात की,

बिर्ला मातुश्री सभागार. ओकीबोकी, रीत्या खुच्र्याच्या हारींनी रेखलेली, धूसर काळोखानं भरलेली, भयाण स्तब्धतेनं व्यापलेली केवढी तरी पोकळी. केवढी तरी लांब, केवढी तरी रुंद. जणू राक्षसाच्या घरचा पेटारा आणि स्वप्नातल्या सात दालनांपलीकडे शिळा होऊन बसलेल्या राजकन्येसारखी ती अगदी टोकाला प्रकाशाच्या एकाच झोतानं उजळलेली पांढरीफेक साध्वी बिर्ला मातुश्री- पुतळ्याच्या निश्चलपणे चष्म्यातून दिवस-रात्र टवकारून पाहणारी. रीत्या रंगमंचावरून एकटेपणी सहज पाहावी, तो उरात कसनुशी धडकी भरविणारी. पोटात खड्डा पाडणारी. काळजाचा एखादा ठोका चुकविणारी.
- आणि मंद उकाडा.. एखाद्या उन्हात वाळवलेल्या आणि मग निववलेल्या पांघरुणात लपेटून बसावं, तसा आतून चुटपुटता बेचैन करणारा, पाठीच्या पन्हळीत घामाची ओली लव मधूनच उठवणारा. पंखे बंद. एअरकण्डिशनला सुट्टी. हे आड दिवसाचं, आड वेळेचं थिएटर. लग्नाविना मांडव किंवा रंग धुऊन बसलेली वारांगना. तितकंच ओकंबोकं, भयाण, असह्य़, निस्त्राण. सारं अस्तित्व धुपून गेल्यासारखं. थकलेलं, मरगळलेलं, जडशीळ होऊन ओठंगलेलं, जीवन्मृत. उजेडाच्या आणि काळोखाच्या सीमा पार हरवून बसलेलं.

रंगमंचावर त्यामानानं बरी परिस्थिती दिसते आहे. पडदा दुभंगलेला आहे. दोन-चार प्रकाशझोत वेगवेगळ्या बाजूंनी येऊन लोळले आहेत. मागल्या बाजूला एका नृत्यनाटिकेचा ‘डेकोरेटिव्ह’ पडदा. रंगमंचावर एक ठसठशीत बाई दुसऱ्या एका फिक्या माणसाला काहीतरी समजावून सांगत आहे. त्या माणसाची दाढीच तेवढी लक्षात राहते. पलीकडे काही खुच्र्या, एक टेबल. आणि एक हाडकुळा स्काऊटमास्तर शिट्टी बोटांभोवती घुमवीत रेंगाळतो आहे. तीन बाया- यातली एक उंच- हातात कार्डबोर्डच्या ढाली घेऊन फिरताहेत, येताहेत आणि पुन्हा जाताहेत. डोक्याला पावसाळी थाबडी टोपी ‘फिट्ट’ केलेला, उंच, काटकिळा एकजण येतो आणि विचारतो, ‘‘भाई, हे ठीक आहे ना?’’

भाई नावाचा तो कुणीतरी- जाडा चष्मेवाला- ‘फर्स्ट क्लास’ म्हणतो आणि हा रंगमंच, हे थिएटर हे सर्व काही आपल्यासाठीच घडवलं असल्यासारखा इतस्तत: फिरत राहतो- आत्मविश्वासानं. सुखानं. अगदी रुची घेत घेत. कधी त्या ठसठशीत बाईच्या वाटाघाटीत भाग घेतो, तर कधी स्काऊटमास्तरशी कुजबुजतो आणि केव्हा नुसताच गुणगुणतो; स्वत:शीच, स्वत:साठीच. तेवढी क्षणमात्र-सारी नि:स्तब्धता त्या सुरावटीच्या फुलपाखरांनी अंतर्बाह्य़ मोहरून जाते. मुक्त, उत्स्फूर्त, बांधेसूद, प्रसन्न अशी सुरावट. कुणीतरी कुणाला तरी हाक मारतं. कुणीतरी प्रेक्षागृहातून कोल्हापुरी वहाणा वाजवीत जातं. कुठंतरी ठोक् ठोक् सुरू होते, आणि त्यातच कुणालातरी ढोलकीवर हलकी सम घेण्याची लहर येते..
तो जाडा चष्मेवाला आत्मविश्वास आता, एकीकडे त्या समेवर मान मुरडून नुकत्याच येऊन उभ्या राहिलेल्या कुणालातरी सांगतो, ‘‘शहाण्या माणसानं नाटक करू नये, चर्चा करावी.’’

तो उभा राहिलेला हसतो. वाटाघाटी करणारी ठसठशीत बाई उभी राहून समोरच्या ‘दाढी’ला रंगमंचावर कसल्यातरी जागा दाखवू लागते. दोन गडी रंगवलेली एक खोटी भिंत घेऊन रंगमंच ओलांडून जातात. एक चष्मेवाली कोपऱ्यातल्या बाकावर बसून काहीतरी आठवू लागते आणि पगडी घातलेला एक जाडा आपल्याच पगडीच्या शानीत येतो आणि इकडेतिकडे घुटमळत राहतो. रंगमंचावरून प्रेक्षागृहात आता एक झारदार मर्दानी लकेर सफाईनं उतरते आणि डाव्या अंगानं मागे निघून जाते. ‘‘हा लाला देसाई..’’- जाडा चष्मेवाला आत्मविश्वास.. नवख्या माणसाला सांगतो, ‘‘काय गळा आहे!’’

प्रकाशझोत विझतात. बदलतात. वाढतात. कमी होतात. चर्चा होते- ठसठशीत बाई आणि चष्मेवाला आत्मविश्वास. एक-दोघे सल्ला देतात; एक-दोघे नुसतेच पाहतात, ऐकतात. बाकडय़ावरची विसरभोळी बाई आठवून आठवून कसल्यातरी नोंदी करते आणि उंच बाई पुन्हा एकदा निमित्त सापडल्यासारखी तरातरा येऊन जाते. एक टक्कलवाला गोरा गृहस्थ टपोऱ्या शुभ्र फुलांचा मोठा बांधीव गुच्छ आतून बाहेर आणि बाहेरून पलीकडे आत नेतो. मागे एक खुर्ची खाड्दिशी आपटते. त्यानिमित्तानं लक्ष पुन्हा मागे जातं आणि भास होतो, की हे सारं- रंगमंचावर आणि खालचं मिळून- एक स्वप्ननाटक आहे किंवा भासचित्र किंवा तसलं काहीही! पण हे खरं नव्हे.

पण मग तो चष्मेवाला आत्मविश्वास एकदम पृच्छा करतो- ‘‘रेडी एव्हरीबडी? सुनीता, वुई स्टार्ट नाव् अं!’’
क्षणभर जड शांतता. मग ‘‘ओ येस्..’’ ठसठशीत बाई ऊर्फ सुनीता.
‘‘कर्टन!’’ तो ओरडतो.

पडदा दोन्ही बाजूंनी येऊन एकसंध होतो. स्वप्ननाटक तात्पुरतं भंगतं. रंगमंच झाकला जातो. अंतरंग झाकलं जातं. आणि जणू एक लांब-रुंद दगडी चेहरा समोर उरतो. काहीही न सांगणारा. त्यासाठीच तो असतो- दर्शनी पडदा. काहीही न सांगण्याकरता. अपेक्षा निर्माण करण्याकरता. उत्सुकता ताणण्याकरता.

हजारो भुंग्यांनी गजबजल्यासारखं थिएटर. माणसांनी फुललेलं, रंगांनी खुललेलं. वेगवेगळ्या सुगंधांनी दरवळलेलं. धूसर प्रकाशाची धुंदी चढलेलं. पडद्यामागच्या वाद्यमेळानं भारलेलं. आणि प्रकाश आणखी धूसर होतो. अखेर नाममात्रच त्याचे कवडसे दूरदूरवर राहतात आणि दर्शनी पडद्यामागून शब्दांच्या गोंडस लकेरी बाहेर ओसंडू लागतात..
‘‘या या या या, मंडळी, या.. या, मंडळी, या.. या, या..’’

भाऊसाहेब, काकासाहेब, दादासाहेब, अण्णासाहेब, अक्कासाहेब, बाईसाहेब.. साऱ्यांचं भरभरून स्वागत. छोटय़ा बाळूचाही विसर नाही. पुरुषी आवाजाच्या जोडीला स्त्रीचा घरगुती, रेखीव शब्द.
- आणि निघतात सनईचे सूर.. ‘वराती’चा ‘मूड’ निर्माण करणारे.

पडदा दुभंगतो. आता प्रकाशाच्या नेमक्या फेकीनं उजळून निघालेली रंगमंचाची झगमगती चौकट समोर आकारते. मागे साधा निळा ‘कव्हर’चा पडदा.

‘वाऱ्यावरची वरात’चं पालुपद आळवणारा संच आपलं काम करून विंगेत जातो आणि दुडक्या चालीनं एक स्थूल देह लोटल्यासारखा रंगमंचाच्या मध्यभागी येऊन कसाबसा थांबतो. तोच तो- चष्मेवाला आत्मविश्वास. ‘‘सुनीता, वुई स्टार्ट नाव् अं!’’ म्हणणारा. ‘कर्टन’ची सूचना देणारा. मनानं रंगमंचाची रुची घेत, सुरांच्या चोरटय़ा लकेरी उडवीत त्या दिवशी इतस्तत: वावरणारा. ‘शहाण्या माणसानं चर्चा करावी, नाटकं करू नयेत..’ त्याचे शब्द.. नाटकंच करावीत, ज्यांच्यापाशी तेवढी धमक असते ते नाटकंच करतात, चर्चा करीत नाहीत, असं बजावणारे..
त्याच्या पहिल्याच पावलाला प्रेक्षागृहात हास्य खळबळू लागतं आणि पहिल्या वाक्याला त्याचा मोठा स्फोट होतो- ‘‘आता इथून गेलं ना, ते घोडं आमचंच!’’

बराच वेळ साथ जमवून आणि नोमतोम करून गवयानं अखेर पहिल्या समेवर आदळावं, तसा सारा कार्यक्रम इथं गच्चदिशी समेवर आदळतो आणि हुशारला प्रेक्षक सावरून बसतो. रंगमंचावरून चष्म्याच्या भिंगांवाटे भुवया किंचित आक्रसून पाहणाऱ्या शोधक नजरेला हवं ते सापडतं आणि दुणावल्या आत्मविश्वासानं, घरगुती सहजतेनं आणि अंगच्या जिद्दीनं पुढली वाक्यांची फेक चालू होते. हशांच्या पावत्या घेऊ लागते. आपण निर्माण केलेल्या वल्लींना सामोरी होऊन आपल्यावरचे आपलेच विनोद रंगमंचावरची ही चतुर आणि कसबी वल्ली अंगावर घेऊ लागते. उठणाऱ्या हशांनी प्रफुल्लित होऊ लागते. मनाजोगत्या न उठणाऱ्या हशांची कारणं तिरकस नजरेनं प्रेक्षकांत शोधू लागते. वाद्य मनाजोगतं बोलावं म्हणून बजवय्याचा अट्टहास, तसा समोरच्या प्रेक्षकांबद्दल जणू या चष्मेवाल्याचा अट्टहास. समोरचा प्रेक्षक मनाजोगता ‘बोलू’ लागेपर्यंत आपल्या विनोदाच्या तारा पिळण्याची त्याची खटपट. परंतु ती करताना मुद्रेवर तोच आरंभीचा लटका बावळटपणा, शब्दांच्या फेकीत तीच मुलायम सहजता. आवाजात मार्दव, जिवणीवर चोरटं स्मित आणि चष्म्याआडच्या डोळ्यांत मात्र शोधक अस्वस्थता.

होता होता तपकिरीचा किंचित साहित्यिक एजंट अंतर्धान पावतो. एका व्याख्यान समारंभाची आठवण जागी केली जाते आणि पाठोपाठ त्या व्याख्यानाशीच आपण पोहोचतो. ‘कव्हर’चा निळा पडदा बाजूला झाला आहे. एखाद्या आडगावच्या व्याख्यान समारंभाचा मालमसाला समोर मांडला आहे. पाच-सात बाप्ये, तीन-चार बाया, मागे एका काल्पनिक संस्थेचा ‘बॅनर’ आणि टेबलामागच्या ‘महत्त्वा’च्या खुर्चीत स्वत: सर्वाचा लाडका चष्मेवाला. आता कार्यक्रम चांगलाच ‘तापला’ आहे. रंगमंचावरच्या त्या दृश्यावर- त्यातही त्या टेबलामागच्या खुर्चीवर शेकडो नजरा खिळल्या आहेत; दुसरं-तिसरं काही नाही, मुबलक हसू मागणाऱ्या. जिवण्या विलगल्या आहेत, माना उंचावल्या आहेत, हात घट्ट जुळले आहेत, श्वास जडावले आहेत. पोटात कुठंतरी हसण्याची निकड दुखते आहे आणि स्वागतपर पद्यवाल्या बावळट बायांच्या हातांतल्या कार्डबोर्डच्या ढालींवरची ‘सुस्वागतम्’ या अक्षरांची बायांप्रमाणे उलटापालट होऊन प्रत्यक्षात ‘सासुगंमत’ किंवा या प्रकारचं काही समोर दिसू लागताच प्रेक्षकांची पोटं पुन्हा फसफसू लागतात आणि हास्याचे टोलेजंग मजले उठू लागतात. चष्मेवाला मागे खुर्चीत बसून ही आपली ‘कर्तृक’ संतुष्ट नजरेनं पाहत असतो. आता प्रेक्षक त्याच्या मनासारखे ‘बोलू’ लागलेले असतात. वाक्या-वाक्याला हशा उसळत असतो. एका हशातून दुसरा हशा निघतो. हास्याचे नुसते कल्लोळ प्रेक्षागारात उठत-फुटत असतात. आणि मधून मधून यात वाक्य लोपून केवळ त्यावरचा हशाच- खरं म्हणजे स्फुंदून स्फुंदून उठत राहतो.

हा ‘व्याख्यान समारंभ’ जरा लांबतोच; परंतु प्रेक्षकाला त्याची दखल नसते, भान नसतं. दखल असते- घडय़ाळांना आणि चष्मेवाल्याला. त्याच्या मनात काटछाटीचे विचार सुरूदेखील झालेले असतात. आक्रसल्या भुवयांखालची नजर पुढय़ातल्या पाठमोऱ्या ‘समारंभा’वर यादृष्टीने फिरूदेखील लागलेली असते. त्यातल्या ‘जागा’ हेरू लागलेली असते. पुढल्या अभंग, पोवाडा आणि लावणी गायनात तो साथीदारांसह घुसतो, तो बहुधा हाच विचार मनात घोळवीत. तो गातो, लचकतो, मुरडतो आणि मग शेवटी चक्क वारकरी बनतो. मागे-पुढे उडू, नाचू लागतो. वारकऱ्यासारखा रंगतो, रंगवतो. ‘ब्रह्मानंदी’ पोहोचलेला वाटतो. ‘वरातीमागलं घोडं’ शोधीत लोटत, लडबडत रंगमंचावर आलेली त्याची ती पावलं इथे हलकीफुल होऊन ‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात नुसती नृत्य करू लागलेली दिसतात. स्थूल काया पिसासारखी हलकी झालेली असते. रोमरोमांत लय भरलेली असते आणि प्रेक्षागारातदेखील ती फिरू लागलेली असते.. साक्षात् इंद्रायणीचा काठ थिएटरात क्षणभर अवतरतो.. विठूचा गजरदेखील कानी येत राहतो.. मघाचचा चटोर चष्मेवाला तो हाच की काय, असा साक्षात् प्रश्न कुणाला पडावा.. परंतु हा तोच!.. हा ‘बटाटय़ाच्या चाळी’तलाच; पण ‘चिंतन’शील चष्मेवाला, ‘तुका म्हणे’, ‘भाग्यवान’, ‘तुझे आहे तुजपाशी’मधला भावुक, अंतर्मुख चष्मेवाला.. ‘जोहार मायबाप’ चित्रपटात चोखामेळा बनून अक्षरश: भक्ती जागलेला चष्मेवाला.. हा ‘कृष्णाकाठचे कुंडल’मधला परंपरेचं ऋण साक्षात रक्तात वागवणारा चष्मेवाला.. सुरांत रंगणारा, लयीत विरघळणारा कलावंत.. आणि तरीही मघाचाच, किंचित्काल- आधीचाच चटोर, चावट, मिश्किल, वर वर बावळट, पण अगदी हिशेबी चष्मेवाला.. दोन्ही एकच.. हीच तर किमया.. यासाठीच तर विठूचा गजर!..

संपलं. गजर ‘विंगे’त निघून जातो आणि रंगमंचावर पाहता पाहता वारकऱ्याचा विनोदी लेखक होतो- चष्मा सावरत खेडवळ जीवनाच्या या रम्य काल्पनिक चित्राच्या पाश्र्वभूमीवर आजच्या खेडय़ाचं विदारक चित्र रंगमंचावर बोलावतो आणि त्यात स्वत:ची कुचंबणा आणि किंचित विटंबनाही हौसेनं करून घेतो. विदारकता हास्याच्या कल्लोळात बुडाल्यासारखी वाटते, बोध बालिश मनोरंजनात हरवतो की काय, असं होतं; पण तेच अभिप्रेत असतं. पदवीनं प्रोफेसर असला आणि व्यवसायानंही काही काळ प्रोफेसर म्हणून जगला असला तरी हा चष्मेवाला रंगमंचाचं ‘व्यासपीठ’ करू इच्छित नाही. किंबहुना व्यासपीठाचा रंगमंच करणं त्याला अधिक पसंत. सूर, लय, नाटय़, हास्य हेच त्याचं क्षेत्र. विशेषत: हास्य. ‘विठू’च्या गजराच्या लयीनं क्षणमात्र भरलेलं, भारलेलं थिएटर पाहता पाहता हास्याच्या उकळ्यांनी उतू जाऊ लागतं आणि हा अमृताहून गोड भासणारा नाद श्रुतींत भरभरून घेत चष्मेवाला पुढल्या इरसाल ‘साक्षी’च्या ‘वन मॅन शो’ची मानसिक तयारी करू लागतो. त्यासाठी ‘फुरफुरू’ लागतो. सारं काही हिशेबाबरहुकूम चाललेलं असतं; थोडं जास्तच.. अपेक्षेपेक्षा अधिक.. क्वचित अनपेक्षित जागांवर हास्याचे भुसनळे फुटतात.. अपेक्षित जागा येण्याआतच प्रेक्षागृह हास्यानं तुडुंब भरून जातं.. आणि अपेक्षित जागा मूळ अपेक्षा तोटकी ठरवतात.. उठलेला हास्यकल्लोळ एकेकदा थांबत नाही, थांबतच नाही. थांबणारदेखील नाही- कधीच थांबणार नाही- असं क्षणभर वाटतं.. थिएटर कोसळणार असं वाटतं.. वाद्यातून बोल काढणाऱ्या वादकाला वाद्य आपसूक बोलू लागलेलं दिसावं, म्हणजे त्याच्या काळजात क्षणमात्र जे लकलकेल, मनात क्षणभर जे सरकून जाईल, ते अशावेळी कदाचित या चष्मेवाल्याच्या संवेदनक्षम, कुशाग्र मनात क्षणभरच, पण- दाटत असेल का? सूत्रधाराचा, कर्त्यांचा आत्मविश्वास आणि हिशेब अशा क्षणी पुरता लोपत असेल आणि कर्तुमकर्तुम् आदिशक्तीपुढं युगानुयुगे लीन होत आलेला नगण्य, क्षुद्र, असहाय, मूढ मानव- तेवढाच कदाचित एक क्षणभर उरत असेल..

पण नस्त्या कल्पना नकोत! तो पाहा, चष्मेवाला एखादं नर्मविनोदी वाक्य टाकून हास्याची पावती वसूल करण्याकरता चष्म्याच्या भिंगांतून किलकिल्या डोळ्यांनी पाहत अडून राहतो आणि ती मिळाल्यावरच पुढं जातो आहे.. हास्याची लाट ओसरत असल्याचं जाणवताच केवळ एखाद्या हालचालीनं किंवा आविर्भावानंदेखील मुक्त, खळाळतं हास्य निर्माण करतो आहे.. प्रेक्षक ‘बोलणं’ ही त्याची या क्षणी एकमेव आवड आहे. त्याच्या मनमोकळ्या, अगदी पाशवी हास्याचा नाद ऐकणं ही त्याच्या कानांची भूक आहे. त्या हास्याच्या वादळी समुद्रात मजेनं पाय चुळबुळवीत किनाऱ्यावर बसून तृप्त होणं हा त्याचा आनंद आहे.. ही जिद्द आहे.. धुंदी आहे.. आणि हे सारं त्याला साध्य आहे.. अगदी हात जोडून सेवेला उभं आहे.. हुकमेहुकूम.. क्षणमात्र होईल ही लाट त्याच्यावर स्वार.. किंवा तसा भास होईल.. पण एरवी तोच लाटेचा स्वामी आहे. तोच याक्षणी त्या रंगमंचाचा आणि शेकडो धडाडती काळिजं सामावणाऱ्या या प्रेक्षागृहाचा स्वामी आहे.. तोच त्या प्रकाशाचा आणि अंधाराचा स्वामी आहे..

मध्यांतर. विद्युद्दीप उजळतात आणि ‘बाहेर सगळी व्यवस्था आहे.. जे लागेल ते- तितकं विकत घेऊन खा, अनमान करू नका,’ म्हणून सांगणारा तो आर्जवी, गोंडस आवाज त्याच्या धन्यामागोमाग अंतर्धान पावतो. समोर पुन्हा तो एकसंध दर्शनी पडदा.. नव्यानं अपेक्षा चाळवणारा, उत्कंठा ताणणारा.. मख्ख! कुणीतरी कुणालातरी म्हणतं, ‘‘करमणूक म्हणून ठीक आहे..’’

- आणि कुणी आणखी कुणाला बजावतं- ‘‘ग्रेट!’’
चष्मेवाला. घर- बिछायतीवर लोळलेला. चिंतनमग्न. जवळ सवयीनं पेन, कागद. टीपॉयवर सकाळची वर्तमानपत्रं. यांतल्या एक-दोनांत तरी ‘वराती’ची समीक्षणं. एखादी सनसनाटी बातमी छापावी, तशी गरमागरम. फोन सारखा वाजतो आहे. लोक तिकिटं किंवा कंत्राटं मागतात किंवा अभिनंदन करतात. हे सारंच कंत्राट सुनीता नामे ठसठशीत बाईकडे सुपूर्द. अगदी तहहयात.
पोस्टमन पत्रं आणून टाकतात. सगळी अभिनंदनाची, स्तुतीची, कौतुकाची. व्याख्यानांची निमंत्रणं, प्रस्तावनेची गळ, लेखासाठी विनंत्या, कथाकथनासाठी विचारणा, ग्रंथप्रकाशनाची मागणी, इत्यादी लफडी त्यांत बहुधा असतातच. परंतु-
‘‘आमच्या आयुष्यात तुम्ही खरेच आनंदाची हिरवळ निर्माण केलीत..’’
‘‘तुमच्या वरातीनंतर आता दोन महिने सगळे करमणुकीचे कार्यक्रम रद्द..’’
‘‘तुमचा कालचा कार्यक्रम भलताच हास्यास्पद वाटला.. इतका मी कधीच हसलो नव्हतो..’’
‘‘ही वाईची दुर्गी कोण?..’’
हे नमुने तूर्त फार..

भेटायला मित्रमंडळी येतात आणि कालच्या कार्यक्रमाच्या घोळघोळून आठवणी काढतात.. आठवणीनंही गुदगुल्या झाल्यागत हसत राहतात.. त्याआधीच्या कार्यक्रमाशी तुलना करतात..

फोटोग्राफर अल्बम घेऊन येतो. कार्यक्रमाचे फोटो. गदगदून हसणारे यशवंतराव, टाळी देणारे बाबूराव, अक्षरश: घोडय़ासारखा खिदळणारा कोणीतरी आणखी ‘राव’, डोळ्यांत पाणी जमेस्तोवर हसून दमलेल्या आयाबाया, जागच्या जागी उशा घेणारी पोरंटोरं, न हसवल्यानं डोळे मिटून हसत बसलेला संपादक, एरवी भारदस्त, गंभीर, विचारमग्न, चिंताग्रस्त, लांब दिसतील असे कित्येक हसरे, खुलले चेहरे, या साऱ्या गदारोळात न हसण्याचा तोंड दाबून प्रयत्न करणारा कोठल्यातरी बँकेचा काळा चष्मेवाला मॅनेजिंग डायरेक्टर.. आणि उरलेला सगळा आपला चष्मेवाला.. रंगमंचावर, रंगमंचामागे, कोणातरी बरोबर, एकटा, डोक्यावर फडकं गुंडाळलेला, पोटाला अ‍ॅप्रेन बांधलेला. पेटी वाजवताना, गरबा खेळताना, उडय़ा मारताना, थुंकताना, मेंदीनं हात माखलेल्या सौ.च्या तोंडाशी फोनचा घसरता रिसीव्हर धरताना, रामागडय़ाशी चार सुख-दु:खाच्या गोष्टी करताना, लावणी म्हणताना, अभंग नाचताना..

बिछायतीवरचा चष्मेवाला हे सारे फोटो किलकिल्या डोळ्यांनी आणि आक्रसल्या भुवयांनी न्याहाळतो. पाय जरा जास्त ताणतो. ‘डब्बल’ जिवणी थोडी हलवतो. मग खूश होऊन बोटांनी पोटावर ठेका धरीत एक सुरावट सिगारेटच्या धुरासारखी सोडून देतो आणि हाकारतो, ‘‘सुनीताबाई, आणखी दोन कप चहा टाका.’’
कुशीदेखील वळण्याची तसदी तो घेत नाही. तूर्त वळण्याची आवश्यकता नसते.

विजय तेंडुलकर
लोकसत्ता
६-नोव्हेंबर-२०११